मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक १४२

पौ अधिक वा ४ शुक्रवार.
श्रीशंकर. १६९६ अधिक वैशाख शुद्ध १३

राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री बाबूरावजी स्वामीचे सेवेसीं:-
पो कृष्णराव नारायण सां नमस्कार विनंती उपरी येथील कुशल ता छ १२ सफर जाणून स्वकीय कुशल लिहित असावें. विशेष. आपण पत्र तीर्थरूपांस पाठविलें तें पावोन लिखितार्थ कळों आला. श्रीमंत मातुश्री गंगाबाईस पुत्र जाहाला, ह्मणून लिा. त्यावरून संतोष जाहाला ! त्याचा विस्तार कोठवर ल्याहावा ? जगन्निवासे प्रजेचें पालण करणार उभे केले ! आतां योजिलें कार्य थोडेच दिवसांत घडोन येईल ! वरकड सविस्तर राजश्री लक्ष्मणपंतदाद यांनी लिा आहे, त्यावरून कळों येईल, तीर्थरूप राजश्री नानासाहेब अद्यापि येथें येऊन पावले नाहींत. एक दोन रोजीं येतील. टोंक्यास आलियाची बातमी आली होती. सत्वरच येतील. राजश्री बापूंचा व नानांचा कागद राजश्री सेनासाहेबसुभा यांस आला नाहीं. पुत्र जोहालियाचें वर्तमान राजश्री हरीपंत तात्यांनी सांगून पा होतें व आपलें पत्रही आलें, त्यावरून त्यांसही फारच संतोष जाहाला. हाल्लीं उभयतांची पत्रें यजमानास पा द्यावीं. वरकड़ रा दादांनीं लिा आहे, त्यावरून कळेल. बहुत काय लिहिणें ? लोभ करीत जावा. हे विनंती.

स्वामीचे सेवेसीं पोष्य बाळाजी गणेश कृतानेक साष्टांग नमस्कार, विनंती. लिा वरून सविस्तर कळों येईल. आपलीं पत्रें येतात. परंतु माझें स्मरण पत्रीं होत नाहीं. सेवकास उमेद तों मोठी होती. परंतु पत्रींच विसर ! तेथें वरकड गोष्टी कशा घडतील ? मर्जीस आलियासी कृपापत्रीं सांभाळ करीत जावा. सुज्ञांस विस्तार लिहिणें लागत नाहीं. बहुत काय लिहिणें? कृपेची वृद्धी करावी. हे विनंती.

सेवेसीं गणेश नारायण सां नमस्कार विनंती लिा परिसोन सेवकांचे विस्मरण नसावें. हे विनंती.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries