मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

शिवगड, शिवगंगा व शिवपूर.

पुण्याच्या दक्षिणेस दहा बारा मैलांवर सिंहगड नांवाचा प्रसिद्ध किल्ला आहे. त्या किल्याचे सिंहगड हें नांव शिवाजीनें तानाजी मालुस-याच्या स्मरणार्थ ठेविलें; व मराठ्यांच्या इतिहासांत त्याच नांवानें तो किल्ला प्रसिद्ध आहे. शिवाजीच्या पूर्वी मुसलमानांच्या अमदानींत ह्या किल्याला कोंडाणा ह्मणत असत, हें नांव मुसुलमानांनीं फारशी भाषेंतून ठेविलेलें नाहीं. गडाच्या पूर्वेस कोंडणपूर ह्मणून एक गांव आहे, त्यावरून सान्निध्यामुळें कोंडणा असें गडाला मुसुलमानांच्या पूर्वीच नांव पडलेलें आहे. “अस्ति दक्षिणपथे कुंडिनपुरं नामनगरम्” हें पंचतंत्रांतील वाक्य सर्वश्रुत आहे. तेंच हें कुंडिनपुर ऊर्फ अपभ्रंशानें कोंडणपुर असावें. परंतु हेंही ह्या किल्याचें सान्निध्यानें नांव पडलेलें आहे; खरें नांव नव्हे. ह्या किल्याचें खरें नांव शिवगड. गडाच्या माचीवरील कोळी आणि कल्याण वगैरे आसपासच्या खेड्यांतील गांवढे ह्या गडाला शिवगड ह्मणतात. ह्या गडापासून जी नदी कोंडणपुरावरून पूर्वेकडे शिवापूरास जाऊन वनेश्वरावरून नीरेला मिळते, तिला शिवगंगा ह्मणतात. तिच्या कांठी असलेलें मोठें गांव शिवपूर होय. हें गांव शिवाजीच्या वेळेस अगदीं मोडकळीस आलें होतें. तेथें शिवाजीच्या मनांत एके वेळीं आपली राजधानी करावी असें येऊन, या गांवाची चांगली उस्तवारी झाली व त्यास शिवापुर असें नांव पडलें.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries