संस्कृत भाषेचा उलगडा

परस्मै आणि आत्मने मिळून एकंदर ३१ रूपे आहेत. यका एकतिसात दोन भेद अगदी सकृद्दर्शनीं पडतात. परस्मायक रूपे आत्मनायक रूपे. परस्मायक रूपात सहा उपभेद आहेत व आत्मनायक रूपात पाच उपभेद आहेत. मिळून एकंदर अकरा भेद होतात. ही अकरा रूपे अगदी स्वतंत्र सर्वनामे आहेत. कोणतेही रूप कोणत्याही दुसऱ्या रूपाचा अपभ्रंश नाही, असे निश्चयात्मक विधान करण्यास कारणे आहेत. आनि, आमि, मि, अम्, अ व औ या सहा प्रत्ययांपैकी आमि हा प्रत्यय मूळ धरून, बाकीचे प्रत्यय त्याचे अपभ्रंश आहेत, अशी कित्येक भाषाशास्त्रज्ञांची समजूत आहे. पैकी आमि चे आनि रूप का होते हे त्यांना नीट सांगता येत नाही. आज्ञार्थ दाखविण्याकरिता, म चा न केला, असे ते म्हणतात. तसेच, आमि तील आ काढून टाकून मि बनविला, आ चा अ करून व इ काढून टाकून आमि चे अम् झाले व अम् चा म् लोप होऊन अ झाला इत्यादी चर्पटपंजरी हे लोक करतात. या चर्पटपंजरीत ऱ्हस्वीकरण, अन्त्यलोप वगैरे नवी नवी नांवेही या लोकांनी बनविली आहेत. परंतु, या चर्पटपंजरीत विशेष अर्थ नाही. इ गळून, म् गळून व आद्य आ चा अ होऊन, आमि चा अ झाला, हे विधान करणाऱ्याला असे दाखविता आले पाहिजे की, १) आमि हे सर्वनामरूप मि, अम्, अ व औ या सर्वांच्याहून आधीचे आहे, २) इ गळून जाण्याला हजार पांचशे वर्षें गेली पाहिजेत, ३) म् गळून जाण्याला तितकाच वेळ गेला पाहिजे आणि ४) आ नाहीसा व्हावयाला आणिक तितकाच वेळ गेला पाहिजे. या चार बाबी आदौ सिद्ध करून नंतर, ५) विधान करणाऱ्याला असेही दाखविता आले पाहिजे की, आमि, आम्, आ यांच्यापैकी कोणतेही पूर्व-पूर्व रूप भाषेत जारीने प्रचलित नसून फक्त अ हे रूप भाषेत प्रचलित आहे. यापैकी कोणती एकही बाब सिद्ध न करता, अमुक गळाले, तमुक गळाले, वगैरे नुसती गलन्ती सांगणाऱ्या भाषाविचक्षणाच्या विधानांवर विचारवंतांचा बिलकुल विश्वास बसणार नाही. तशांत असे जर उलटपक्षी दाखवून देता आले की, मि, आमि व अम् ही रूपे एकाच काळी एकाच अर्थी योजिली जात असत, तर वरील गलन्तीचा पक्काच पचंबा उडतो.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries