संस्कृत भाषेचा उलगडा

५४ (१) भ्वादि धातू. अन्त्य स्वर व उपान्त्य ऱ्हस्व स्वर यांचा गुण होतो म्हणून पाणिनी सांगतो. एकाएकी गुण काय म्हणून होतो? अविकरण भाषेत गुण वगैरे काही विकार न होता प्रत्यय लागतात; परंतु सविकरण भाषेत गुण होतो. हा असा भेद का? याचे कारण असे आहे की भवति, नयति, सेधति हे वस्तुत: यङलुक् चे अवशेष आहेत. पूर्ववैदिकभाषेत अशी रूपे असत : बोभो, नेने, सेसेध् इत्यादी. पैकी अभ्यासाचा लोप होऊन पाणिनीय भाषेत भो, ने, सेघ् अशी अवशिष्ट रूपे राहिली, त्या अवशेष धातूंना प्रत्यय लागून पाणिनीकालीन रूपे बनत. मूळ धातू भू, नौ व सिध् होते हे पाणिनी जाणत होता. परंतु यांची भो, ने सेध् अशी सगुण रूपे का होतात, सन्निपात ज्वर झाल्याप्रमाणे एकदम एकाएकी ऊ चा ओ व इ चा ए का होतो, याचे कारण त्याला सांगता येईना. सबब, भ्वादिवर्गातील धातूंचे अन्त्य स्वर व उपान्त्य ऱ्हस्व स्वर यांना प्रत्ययांपूर्वी गुण होतो म्हणजे ऊ चा ओ होतो व इ चा ए होतो असे तो सांगतो. म्हणजे जे होते ते होते म्हणून सांगतो आणि गप्प बसतो. कारण सांगत नाही. कारण वर दिले ते आहे. पूर्ववैदिक भाषेत धातूंची द्विरुक्ती करून फार बोलत. कर् कर् मि, सर् सर् मि, भव् भव् मि असा द्विरुक्तीचा प्रकार इतर रानटी लोकातल्याप्रमाणे रानटी आर्यांच्याही भाषेत फार असे. या द्विरुक्तीचा पुढे कालांतराने संक्षेप होऊन भव् भव् मि चे भो भो मि झाले नंतर प्रथम भो चा लोप होऊन नुसते भो असे रूप राहिले. या भो ला आमि, अति, असि प्रत्यय लागून भवामि, भवति, भवति, ही रूपे झाली. पाणिनी गुण म्हणून ज्याला म्हणतो त्याची ही अशी परंपरा आहे; १) भव् भव्, २) भो भो, ३) भो , येथे प्रश्न अस उद्भवतो की रानटी आर्यांच्या भाषेत मूळ धातू भव् होता, की भव् होता, की भो होता, की भू होता? पाणिनी मूळ धातू भू धरतो तो काय म्हणून धरतो? अभूत्, अभवत्, भूत भूति, भव, भाव अशी रूपे पाणिनीच्या पुढे होती. पैकी भू हे रूप त्याने मूळ धरिले आणि त्या भू ला काय विकार झाले म्हणजे अभवत्, भव, भाव, अभूत् भूत ही रूपे बनतात ते त्याने सांगितले. त्याचे मूळ धातू भव् धरिला असता तरी चालले असते व त्यापासून अभूत्, भूत, भव, भाव, वगैरे रूपे कशी निघाली तेही त्याला सांगता आले असते. भू मूळ धातू धरून अन्त्य ऊ चा गुण होऊन भव रूप बनते हे जसे सांगता आले, तसेच भव् मूळ धातू धरून अन्त्य अव् चे गुणमूळ होऊन अभृत्, भूत्, भूति, ही रूपे होतात हेही सांगता आले असते. ऊ च्या ओ होण्याला जसा गुण हा पारिभाषिक शब्द टांकशाळेतून निघाला, तसा च ओ च्या ऊ होण्याला गुणमूळ वगैरे पारिभाषिक शब्द निघण्यास अडचण नव्हती. तात्पर्य पाणिनीने मूळ धातू भू धरला याला कारण केवळ पाणिनीची इच्छा. मूळ रानटी आर्य मूळ धातू कोणता समजत होते, हे त्याने शोधले नाही.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries