संस्कृत भाषेचा उलगडा

श्री
वैदिक व पाणिनीय संस्कृत
भाषेचा उलगडा

धातुरूपांचे पृथक्करण
ऊर्फ
अवयवीकरण

१ क्रियापदरूपे होताना धातूंच्या पुढे जे प्रत्यय संस्कृत किंवा वैदिक भाषात लागतात ते प्रत्यय मुळांत उत्तम ह्न, मध्यम ह्न, किंवा प्रथम ह्न पुरुषवाचक सर्वनामे आहेत. प्रत्यय बनलेली ही सर्वनामे स्त्री ह्न, पुं ह्न व नपुंसक या तिन्ही लिंगी अविकृत रहातात. याचा अर्थ असा की लिंगाचे प्रत्यय ऊर्फ शब्द निर्माण होण्याच्या पूर्वी धातुरूपे पूर्ववैदिक भाषेत बनून गेलेली होती. करोमि, करोषि, करोति या रूपातील मि, सि व ति ही जोड सर्वनामे स्त्री पुरुष व नपुंसक या तिन्हीपैकी वाटेल त्या लिंगाची दर्शक आहेत व होती. म्हणजे मुळात मि, सि व ति ही सर्वनामे भाषेत लिंगभेदकल्पना उत्पन्न होण्याच्या पूर्वीची आहेत. प्राथमिक पूर्ववैदिक भाषेत धातुशब्दांच्या पुढेही मि, सि व ति सर्वनामे पृथक् उच्चारीत; जसे अद् मि, अद् सि, अद् ति. ति हे लिंगाविहीन सर्वनाम तो, ती, तें या तिन्ही लिंगी योजिले जाई. हाच प्रकार मि व सि या सर्वनामांचा असे. अद् मि, अद् सि व अद् ति ही प्राथमिक पूर्ववैदिक भाषेत सबंध वाक्ये असत. त्यांचा अर्थ मी खातो खात्ये खाते, तू खातोस खात्येस खातेस, व तो ती ते खातो खात्ये खाते, असा सोयीप्रमाणे किंवा इच्छेप्रमाणे वाटेल त्या लिंगाचा असे. पुढेही प्राथमिक पूर्ववैदिक भाषा मृत झाल्यावर अद् मि, अद् सि व अद् ति ही वाक्ये, वाक्ये आहेत ही भावना लुप्त होऊन, अतिपरिचयाने ही वाक्ये अद्मि, अत्सि व अत्ति अशी संहित उच्चारिली जाऊ लागली आणि अलीकडे पाणिनी सारखे वैय्याकरण जेव्हा या रूपांचा विचार करू लागले , तेव्हाक अद् या धातू पुढे येणारे जे मि, सि व ति हे शब्द त्यांना ते प्रत्यय म्हणू लागले. प्राथमिक पूर्ववैदिकभाषा मृत झाल्यावर तिच्या जागी जी द्वितीय पूर्ववैदिकभाषा आली ती भाषा बोलणाऱ्यांना अद्मि, अत्सि व अत्ति हे ध्वनी स्वतंत्र शब्द भासू लागले व त्यांच्या वाक्यत्वाचा त्यांना पूर्ण विसर पडला. इतका पूर्ण विसर की अहं अद्मि या प्रयोगात मी मी खातो अशा प्रकारचा द्विरुक्तिदोष होतो याचे भान नव्हे, ज्ञानही त्यांना राहिले नाही.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries