संस्कृत भाषेचा उलगडा

२४ नपुंसकशब्दांच्या रूपांची आम्ही केलेल्या या साधनिकेची आता पाणिनीने केलेल्या रूपसिद्धीशी तुलना करू. प्रत्येक विभक्तीचे तीन तीन मिळून सात विभक्त्यांचे सु, औ, जस् इत्यादी एकवीस प्रत्यय पाणिनीने मूळ म्हणून निवडून काढिले आणि नंतर जेथे जेथे हे प्रत्यय न लागता दुसरेच प्रत्यय लागतात तेथे तेथे अमुक मूळ प्रत्ययाच्या स्थानी अमुक नवीन प्रत्ययाचा आगम किंवा आदेश होतो, असे सांगण्याचा क्रम धरिला. पुल्लिंगी प्रथमेच्या एकवचनाचा स् प्रत्यय नपुंसकशद्बाच्या प्रथमैकवचनात दिसत नाही, सबब स् स्थानी अम् प्रत्यय येतो, असे सांगण्याकरिता त्याने एक नवीन सूत्र रचिले. औ स्थानीं ई, जस् स्थानीं इ व न्आ गम, शस् स्थानी इ न् आगम, टा स्थानी न् आगम, ङे स्थानी विकल्पे न् आगम् इत्यादी शेकडो ठिकाणी शेकडो आगम त्याला करताना पाहून, पराकाष्ठेची कीव उत्पन्न होते. हे झाले प्रत्ययासंबंधाने, सर्वनामस्थान, भ व पद यांच्या बाबीत मूळ प्रातिपदिकापासून अंगे तयार करण्याकरिता शेकडो ठिकाणी नवीन नवीन सूत्रे रचावी लागली आहेत या सूत्रांच्या जाळ्यांतून वाट काढता काढता नवशिक्या व जूनशिक्या अशा दोन्ही विद्यार्थ्यांचे पंचप्राण कासावीस होतात. इतकेच नव्हे तर ठणठणीत कोरडे होतात. देव शब्दाची देव, देवा, देवे ही अंगे होतात किंवा तस्थिवस् शब्दांची तस्थिवत्, तस्थुष् व तस्थिवांस् ही अंगे होतात हे सूत्रांवरून विद्यार्थी जाणतो. परंतु आगम का होतात, आदेश का होतात, अंगे का बदलतात, हे पाणिनी सांगत नसल्यामुळे, शास्त्राध्ययनापासून मतीला जी प्रगतिशीलता व जो जागतेपणा यावा तो येत नाही. याचे कारण, इतिहासदृष्टीचा पूर्ण अभाव. वैदिकभाषा ही देवांची भाषा असून ती अर्थात् अनादी आहे अशी पाणिनीची विचित्र समजूत होती यात मोठेसे नवल नाही. नवल दुसरेच आहे. वैदिकभाषेपासून संस्कृत भाषा निघाली या अर्थाचा एक शब्द किंवा एक ज्ञापक संबंध अष्टाध्यायीत एकही नाही. वैदिकभाषेचा संस्कृतभाषा हा अपभ्रंश किंवा विपरिणाम आहे, हीसुद्धा कल्पना पाणिनीला शिवलेली नाही. शुद्ध प्रयोग विद्यार्थ्यांना कळावेत म्हणून पाणिनीने सूत्रे रचिली. तत्रापि वेदांत येणारे आर्ष प्रयोग व भाषेत येणारे लौकिक प्रयोग दोन्ही सारखेच शुद्ध आहेत असे तो मानी. छांदस प्रयोग विचित्र दिसला तर छंदासि बहुलं म्हणून वेदांतील अशुद्ध नव्हत, पण हेंगाड्या रूपांसंबंधाने पाणिनी तिरस्कार व उपहास न दाखविता उलटा आदर दाखवितो. या इतिहासांधतेमुळे, वेदांच्यापाठीमागे जग नव्हते व काल नव्हता, इत्यादी प्रगतिविरोधक कल्पना समाजात प्रचलित झाल्या आणि भावीकालासंबंधाने तुच्छता वाटूक लागली. पूर्ववैदिक अनेकभाषा, वैदिकभाषा पाणिनीयभाषा, प्राकृतभाषा व मराठीप्रभृती प्राकृतिक भाषा ही चढती वर्धमान श्रेढी आहे ही कल्पना यावयाची ती न येता, ही उतरती क्षीयमान श्रेष्ठी आहे अशा विपरीत कल्पनेने समाजाचे मन मारून व उदासीन होऊन गेले. इतिहासदृष्टीच्या अभावापासून समाजाचे केवढे घोर नुकसान होते त्याचे पाणिनीय सूत्रे नामांकित उदाहरण आहे.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries